मुंबई – जयंत पाटील आणि आमची भेट तिथे झाली नाही. आम्ही आलो जयंत पाटील आले आणि अर्थ खात्याची चर्चा झाली हा तर्क कुठला लावलाय मला माहित नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना केला.

जयंत पाटील यांचा काय संबंध… त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट का घेतली हे त्यांनी जाहीर केले आहे. तेही एका पक्षाचे नेते आहेत शिवाय एकेकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. अनुभवी नेते आहेत. एक स्वयंभू नेते आहेत. माझी भेट का झाली हे आधीच स्पष्ट केले. प्रफुल पटेल यांना मध्यरात्री बाहेर जायचे असल्याने तेही तिथे आले त्यांचे विषय त्यांनी मांडले हा योगायोग होता हेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मी खासदारही आहे त्यामुळे मुख्यमंत्री भेट म्हणजे ती राजकीय भेट असेल असा काही भाग नसतो. माझ्या मतदारसंघातील विविध विकासकामे आहेत. माझे दिल्ली स्तरावरील प्रस्ताव राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. त्यामुळे अशा वेळी सर्वच गोष्टी ज्ञात असणं अभिप्रेतच नाही. ज्यावेळी राजकीय किंवा पक्षाशी निगडीत विषय येईल त्यावेळी परस्परांशी चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. राजकीय चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करायची असेल तर वहिनींशी आम्ही बोलत असतो. पण लोकसभा मतदारसंघातील विषय असतील त्यावेळी विचारुन जाणं अभिप्रेत नाही. मी दिर्घकाळ राजकारणात आहे. मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. पवारसाहेबांनी आम्हा सर्वांना राजशिष्टाचार शिकवलेला आहे. त्यामुळे संवाद परस्परांशी असावा हे माहित आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

वहिनी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. आमचा संवाद उत्तम आहे. ज्या पध्दतीने दादांशी संवाद होता त्याचपध्दतीचा संवाद वहिनींशी आहे. त्यामुळे गैरसमज असण्याचा प्रश्नच येत नाही किंवा उद्भवत नाही. वहिनींनी आम्हाला बोलावून घेतले हा भाग आमच्या पक्षामध्ये नाही. आम्ही नेहमीतपणे भेटत असतो असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. वहिनींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भेट घेणार आहोत. अनेक बाबींवर, विषयांवर चर्चा करायची आहे. त्यात अर्थखाते हाही विषय आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.