चिपळूण : मुंबई – भांडुप येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या भव्य दिवाळी किल्ला स्पर्धेसाठी यावर्षी चिपळूण येथील किल्ले अभ्यासक व इतिहास प्रेमी श्री. मार्तंड माजलेकर यांना मुख्य परीक्षक म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

भांडुपमधील सर्वात मोठे व प्रसिद्ध असलेले उत्साही मित्र मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी मोठ्या उत्साहात घेतली जाते. यावर्षीही ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या परीक्षणाची महत्त्वाची जबाबदारी मार्तंड माजलेकर यांच्यावर सोपवण्यात आली.

सदर स्पर्धेमध्ये जवळपास ३० किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले. मुलांनी बनवलेल्या या किल्ल्यांमध्ये प्रचंड मेहनत, कल्पकता आणि इतिहासाची जाण दिसून आली. हाय क्लास सोसायट्यांच्या आवारातील मोठे-भव्य किल्ले असोत, चाळ संस्कृतीतील छोटे पण नेटके किल्ले असोत, किंवा डोंगरावर वसलेल्या कोकण नगर सारख्या भागातील किल्ले असोत – प्रत्येक ठिकाणी मुलांनी आपली कलाकारी दाखवली होती.

किल्ल्यांचे परीक्षण करताना केवळ किल्ल्याची रचना नव्हे, तर त्यातील ऐतिहासिक अचूकता, कल्पकता, मांडणी, स्वच्छता आणि मुलांनी घेतलेली मेहनत या सर्व बाबींचा बारकाईने विचार करण्यात आला.

मंडळाकडून खास सन्मान

चिपळूणमधून खास भांडुपला येऊन किल्ला स्पर्धेचे परीक्षण केल्याबद्दल उत्साही मित्र मंडळाने श्री. मार्तंड माजलेकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन खास सन्मान केला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचे व किल्ल्यांबद्दल असलेल्या सखोल ज्ञानाचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना श्री. मार्तंड माजलेकर म्हणाले,

“किल्ल्यांचा अभ्यास करताना आता किल्ला स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खूप वेगळा आणि आनंददायी अनुभव होता. मंडळाने माझ्या अनुभवावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आणि सन्मानही केला, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मुलांनी खूप छान मेहनत घेतली होती. भांडुपसारख्या विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात किल्ले बघायला मिळणे हे खरंच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून लोकांशी संवाद साधता आला, माझा अनुभव आणि माहिती त्यांच्याशी शेअर करता आली, याचा मला मनापासून आनंद झाला.”

या स्पर्धेमुळे लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गडकिल्ले आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास याबद्दल आवड निर्माण होत आहे. तसेच दिवाळीतील किल्ला करण्याची परंपरा नव्या पिढीतही जोमाने जपली जात आहे, हे या स्पर्धेतून दिसून आले.

चिपळूणच्या सुपुत्राला मुंबईसारख्या शहरात मुख्य परीक्षक म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल चिपळूणमधूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.