मुंबई : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतमालाचे भाव सातत्याने पडत आहेत. मोदींनी अमेरिकेपुढे लोटांगन घालून स्वाभिमान गहाण ठेवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे सांगतील तेच काम नरेंद्र मोदी करत आहेत. शेतकरी, तरुणांच्या प्रश्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणंघेणं नाही. झोपे गेलेल्यांना जागे करने सोपे आहे, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी मात्र आसूड हाती घ्यावा लागतो, म्हणून शेतकरी विरोधी भाजपा सरकारविरोधात आसूड मोर्चा काढण्यात आला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. रविंद्र चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, नांदेड शहर अध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, पप्पू पाटील कोंडेकर, बालाजी गाडे पाटील, प्रदेश सचिव श्रवण रापनवाड, धनराज राठोड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.