रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात खैर लाकडाच्या अवैध तस्करीविरोधात वन विभागाने मोठी कारवाई केली असून, धोंडसे व सिद्धेश्वर परिसरात दोन वाहनांसह खैर लाकडाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो क्रमांक MH 06 CP 2260 मधून ₹14,226 किमतीचे खैर लाकूड, तर स्कॉर्पिओ क्रमांक MH 06 AN 1276 मधून ₹13,339 किमतीचे खैर लाकूड जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
खैर तस्करी सुरू असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले. तस्करीविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी संतप्त जमावाने संशयित स्कॉर्पिओ वाहनाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित ताब्यात घेतलेल्या व्यक्ती ऋतिक राठोड, राजू हिलम, रोहित चोरगे, प्रशांत जाधव असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी वन विभागाने CR-2026 व C5-2026 गुन्हा क्रमांकांनुसार भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41(ब) अंतर्गत तसेच महाराष्ट्र वन अधिनियम 2014 चे कलम 31(01) अन्वये वनक्षेत्र कार्यालय, सुधागड-पाली येथे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई परीक्षेत्र वनाधिकारी विशाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये आनंदराव कराडे, उत्तमराव शिंदे, संदीप ठाकरे, सुनील जाधवर, व्यंकट पवार, गुलचंद काकडे आणि अविनाश पवार यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
सुधागडात खैर तस्करीचा पर्दाफाश; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक, स्कॉर्पिओची तोडफोड!मुद्देमालासह संशयित आरोपी ताब्यात
