अलिबाग : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अलिबाग शहरात शेकापच्या वतीने जोरदार निषेध सभा घेण्यात आली.
अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाबाहेर शेकापच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
सभेत बोलताना चित्रलेखा पाटील यांनी, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर करण्यात आलेला लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पूर्ण पाठिंबा असून आगामी काळात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निषेध सभेला शेकाप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
