चिपळूण : चिपळूण-खेंड येथील विभा अरविंद ग्रंथालयाला रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री .शैलेश टाकळे व श्री.सचिव रोहन देवकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन ग्रंथालयाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रंथालयाचे मार्गदर्शक माननीय श्री.प्रकाश देशपांडे तसेच चिपळूण शहरातील सुप्रसिद्ध त्वचाविकारतज्ज्ञ व सौंदर्य चिकित्सक डॉ. यतिन जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन या मान्यवरांचे स्वागत केले. श्री .प्रकाश देशपांडे यांनी यावेळी ग्रंथालय स्थापनेमागील उद्देश, वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
समाजात, विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, ज्ञानार्जनाची आवड निर्माण व्हावी तसेच दर्जेदार शैक्षणिक व संदर्भ साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुप्रसिद्ध साहित्यिक कै. अरविंद जाधव (अप्पा) आणि मातोश्री विभा अरविंद जाधव यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या ध्येयातून हा उपक्रम सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ग्रंथालयामार्फत सर्वसामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक असलेली संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असून, अल्पावधीतच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री शैलेश टाकळे यांनी रोटरी क्लब तर्फे डॉ. यतिन जाधव यांचा त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार केला . वैद्यकीय व्यवसाय सांभाळत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, विभा अरविंद ग्रंथालय व डॉ. यतिन जाधव यांच्या माध्यमातून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांना रोटरी क्लब ऑफ चिपळूणतर्फे वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अध्यक्ष श्री. शैलेश टाकळे व सचिव श्री. रोहन देवकर यांनी दिली.
याप्रसंगी मान्यवरांनी, “ज्ञानसमृद्ध समाज घडविण्यासाठी अशा ग्रंथालयीन व सामाजिक उपक्रमांची आज नितांत गरज आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी ग्रंथालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.