
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातच परिवर्तनाची चाहूल लागली असून, चांदोर-उगवतीवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा हाती घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या शुभदिनी झालेल्या या भव्य जाहीर पक्षप्रवेशामुळे चांदोर-गोळप परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आगामी काळात या परिसरात राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदोर उगवतीवाडी येथे हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले, संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आणि स्थानिक विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले. त्यामुळे हा सोहळा केवळ पक्षप्रवेशापुरता मर्यादित न राहता संघटनविस्तार आणि विकासाचा राजकीय संदेश देणारा ठरला.
भ्रमाचा पडदा दूर झाला, शिवसैनिक पुन्हा मातृपक्षाच्या भगव्यात!
मध्यंतरीच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत मूळचे शिवसैनिक असलेल्या या ग्रामस्थांना विरोधी गटाकडून विविध भूलथापा व प्रलोभने दाखवून आपल्याकडे वळविण्यात आले होते. मात्र कालांतराने वस्तुस्थिती समोर येताच भ्रमाचा पडदा दूर झाला आणि राजकीय वास्तवाचा साक्षात्कार झाला. अखेर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या सर्व ग्रामस्थांनी पुन्हा आपल्या मातृपक्षाच्या भगव्या झेंड्याखाली परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पुनर्प्रवेशाने चांदोर-उगवतीवाडीतील शिवसेनेच्या निष्ठेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, ग्रामस्थांचा भगव्याला कौल
पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त करत चांदोर-उगवतीवाडी येथील दिलीप गुळेकर, सुरेश चांदोरकर, अशोक गुळेकर, माजी उपसरपंच श्री. शांताराम तांबे, विनोद शिंदे, हरिश्चंद्र गुळेकर, शामकांत गुळेकर, सुरेश गुळेकर, संजय गुळेकर, नरेंद्र गुळेकर, यशवंत गुळेकर, शशिकांत तांबे, संतोष तांबे, सतिश तांबे, शंकर तांबे, प्रकाश फुटक, विलास फुटक, मनोहर तांबे, शरद शिंदे, किरण शिंदे, सुहास गुळेकर, किरण गुळेकर, योगेश गुळेकर, संजय करसोडे, अक्षय गुळेकर, नारायण गुळेकर, राज तांबे, आयुष तांबे, तनिष चांदोरकर, सुजल फुटक, शामकांत चांदोरकर तसेच महिला मंडळाने मोठ्या संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी सर्वांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघटना विस्ताराला नवी धार, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जबाबदारी
चांदोर-उगवतीवाडीतील पक्षप्रवेशासोबतच संघटनात्मक बांधणीला देखील गती देण्यात आली. जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
युवासेना गोळप पंचायत समिती गणाच्या उपविभाग अधिकारीपदी श्री. योगेश पड्यार, वॉर्ड क्रमांक २ युवासेना शाखा अधिकारीपदी श्री. सुहास गुळेकर, उपशाखाप्रमुखपदी श्री. सतिश तांबे, गटप्रमुखपदी श्री. शशिकांत तांबे व श्री. दिनेश कुळ्ये, बूथप्रमुखपदी श्री. विनोद शिंदे व श्री. संकेत पड्यार आणि बीएलएपदी श्री. राजेंद्र बनकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे चांदोर-उगवतीवाडी परिसरात पक्षाची बूथपासून पंचायत समिती गणापर्यंत संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.
पक्षप्रवेशासोबत विकासकामांचेही भूमिपूजन
राजकारण म्हणजे केवळ निवडणूक आणि सत्ता नव्हे, तर गावाच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारीही आहे, याची प्रचिती या सोहळ्यात आली. युवासेना गोळप पंचायत समिती गणाचे उपविभाग अधिकारी श्री. योगेश पड्यार आणि चांदोर गावचे उपसरपंच तथा माजी खासदार श्री. विनायकजी राऊत साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री. सूर्यकांत तांबे यांच्या माध्यमातून दुर्गामाता मंदिरासमोर लादी बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
वाडीचे गावकर श्री. दिलीप गुळेकर आणि श्री. योगेश पड्यार यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांचा लढा – दत्ताजी कदम
सोहळ्यात मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. देशातील आणि राज्यातील शेतकरी तसेच तरुण वर्ग विविध संकटांचा सामना करीत असताना त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठविण्याची भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे शेतकरी, तरुणांचे प्रश्न आणि रोजगाराच्या मुद्द्यावर खंबीरपणे लढत आहेत. हा संघर्ष केवळ सत्तेसाठीचा नसून सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठीचा आहे, असे सांगत चांदोर-उगवतीवाडीतील ग्रामस्थांनी या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
चांदोरच्या विकासाचे श्रेय उद्धवसेनेच्या नेतृत्वाला – रविंद्र डोळस
उपजिल्हाप्रमुख श्री. रविंद्र डोळस यांनी चांदोर गावातील विकासकामांचा आढावा घेताना शिवसेना नेते श्री. विनायक राऊत आणि श्री. उदय बने यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे चांदोर गावात अनेक महत्त्वाचे विकासप्रकल्प, पायाभूत सुविधा आणि लोकहिताची कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
चांदोरचा विकासरथ यापुढेही थांबणार नाही. उर्वरित विकासकामेही प्राधान्याने आणि वेगाने पूर्ण करण्यासाठी पक्षाचे नेतृत्व कटिबद्ध राहील, असा विश्वास डोळस यांनी व्यक्त केला.
“तुमची जबाबदारी आता आमची” – शेखर घोसाळे
तालुका समन्वयक श्री. शेखर घोसाळे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना खंबीर पाठिंब्याची ग्वाही दिली. “तुम्ही निष्ठावंतांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता तुमची जबाबदारी आमची आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी “लक्ष्मीच्या पावलाने” पक्षात स्वागत – मयुरेश्वर पाटील
तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदोर-उगवतीवाडीतील ग्रामस्थांचे “लक्ष्मीच्या पावलाने” पक्षात स्वागत केले. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतानाच गावाच्या विकासासाठी आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
“हा प्रवेश ऐतिहासिक ठरेल” – प्रसाद सावंत
माजी युवासेना जिल्हा अधिकारी श्री. प्रसाद सावंत यांनी चांदोर-उगवतीवाडीतील जाहीर पक्षप्रवेशाचे विशेष कौतुक केले. एकाच वाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला या प्रवेशामुळे नवी ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील राजकीय संदेश
चांदोर-उगवतीवाडी हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील गाव आहे. त्यामुळे या जाहीर पक्षप्रवेशाला स्थानिक राजकारणाच्या पलीकडे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातीलच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केल्याने “परिवर्तनाची सुरुवात पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातूनच” असा राजकीय संदेश या सोहळ्यातून दिला गेला.
गावागावांत संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका आणि विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्याची रणनीती उद्धवसेनेने स्वीकारल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. आगामी काळात या प्रवेशाचा परिणाम चांदोर-गोळप परिसरातील राजकीय समीकरणांवर कितपत होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मोठी उपस्थिती
या सोहळ्यास जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख (जिल्हासमन्वयक) श्री. रविंद्र डोळस, तालुका समन्वयक श्री. शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील, माजी युवासेना जिल्हा अधिकारी (जिल्हा युवाधिकारी) श्री. प्रसाद सावंत, लांजा तालुका अधिकारी श्री. अभिजीत राजेशिर्के, पावस विभागप्रमुख श्री. रविकिरण तोडणकर आणि भाट्ये उपविभागप्रमुख श्री. राकेश भाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच चांदोर शाखाप्रमुख श्री. सुनील पड्यार, श्री. राजेंद्र कोलगे, श्री. सनी गोताड, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. गोविंद पड्यार, उपशाखाप्रमुख श्री. दिपक कांबळे, युवासेना शाखा अधिकारी श्री. योगेश पड्यार, उपसरपंच श्री. सूर्यकांत तांबे, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र बनकर, श्रीमती साक्षी चांदोरकर, कट्टर शिवसैनिक रामचंद्र उर्फ दणक्या कोकरे, श्री. संतोष मेस्त्री यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.
चांदोर-उगवतीवाडीतील हा जाहीर पक्षप्रवेश म्हणजे केवळ काही ग्रामस्थांचा पक्षबदल नसून स्थानिक पातळीवर नव्याने उभारी घेत असलेल्या संघटनशक्तीचे प्रदर्शन मानले जात आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातच उद्धवसेनेने संघटनविस्ताराचा हा नवा अध्याय सुरू केल्याने, “परिवर्तनाची सुरुवात पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातून” हा संदेश आगामी राजकीय संघर्षाची दिशा ठरविणारा ठरतो का, याकडे आता रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.