दापोली: आंजर्ले गावातील रस्ता खोदून तब्बल एक वर्ष उलटूनही त्याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने ‘रस्त्याचे वर्षश्राद्ध’ घालत निषेध व्यक्त केला.
महावितरणकडून भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी गेल्या वर्षभरापासून ग्रामस्थांना मोठमोठे खड्डे, चिखल, धूळ आणि वाहतुकीतील अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच रुग्णवाहिकांनाही या रस्त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी रस्त्यालाच प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण करत ‘वर्षश्राद्ध’ आयोजित केले. या अनोख्या आंदोलनातून “रस्ता हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत” असा ठाम संदेश ग्रामस्थांनी दिला.
यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती, कामाची चौकशी, दोषींवर कारवाई आणि भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
आंजर्लेतील या अनोख्या आंदोलनाची सध्या परिसरात मोठी चर्चा असून, आता तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.