चिपळूण : परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (PHRC), घाणेखुंट-लोटे येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी एकाच दिवशी एकूण पाच शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. यामध्ये चार युरोसर्जिकल (मूत्रविज्ञानाशी संबंधित) शस्त्रक्रिया आणि एक जनरल सर्जरीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

यापैकी तीन शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) करण्यात आल्याने स्थानिक रुग्णांना अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रक्रियांची मोफत उपचार सुविधा उपलब्ध झाली. संबंधित रुग्णांना यासाठी अन्य उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये जावे लागले असते. तसेच अशा युरोसर्जिकल उपचारांसाठी तेथे मोठा खर्च येण्याची शक्यता होती. मात्र, PHRC येथे या शस्त्रक्रिया सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये यशस्वीरीत्या आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडल्या.

विशेष म्हणजे, MJPJAY अंतर्गत पात्र रुग्णांसाठी केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर आवश्यक औषधे तसेच रुग्णालयातील उपचार व मुक्कामाची सुविधाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे स्थानिक आणि गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

PHRC येथे अत्याधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीने शस्त्रक्रिया व उपचार करणे शक्य झाले आहे. विशेषतः गंभीर किंवा तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे ही या सुविधेची महत्त्वाची उपलब्धी ठरत आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियांसाठी उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, MPW कर्मचारी तसेच परशुराम हॉस्पिटलमधील संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे. अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय ठरले.

PHRC येथे सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा उभारून ती गरजू व गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी MES प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच ऑपरेशन थिएटरच्या अद्ययावतीकरणासाठी आर्थिक सहकार्य करणारे CA दिलीप दीक्षित सर यांचेही विशेष योगदान अधोरेखित करण्यात आले.

स्थानिक रुग्णांना त्यांच्या परिसरातच अत्यावश्यक आणि विशेष शस्त्रक्रियांची सुविधा, तीही अल्प अथवा विनामूल्य खर्चात, उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने PHRC घाणेखुंट-लोटेची ही कामगिरी ग्रामीण आरोग्यसेवेसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.