रायगड : आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप काही काळ असला, तरी रायगडच्या राजकारणात 2029 च्या निवडणुकीची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाददादा भोईर यांनी पेण विधानसभा मतदारसंघाबाबत मोठा राजकीय दावा केला असून, 2029 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाच आमदार पेणमधून विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पक्ष प्रमुखांनी जी माझ्यावर जबाबदारी सोपवली ती जबाबदारी कर्तव्ये निष्टेने पार पाडीन. असे भोईर म्हणालेत.
‘सत्तेतील भाजप किंवा शिंदेसेनेत जाणार का?’ या चर्चेलाही भोईर यांनी रोखठोक उत्तर दिले. प्रवाहाच्या विरोधात जाऊन सत्याची बाजू मांडणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.सरकारची जुमलेबाजी फोल करण्यासाठी जनतेत जाऊन काम करीत असून, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जनविकासाला प्राधान्य देणे हीच आपली भूमिका आहे, असे भोईर यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांकडून निधीचा अटकावं केला जातो,विकासकामे करताना त्रास दिला जातो, तरीही प्रामाणिकपणे आम्ही जनसेवेत वाहून घेतल असल्याचे भोईर म्हणाले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना भोईर यांनी सत्ताधारी पक्षातील राजकीय समीकरणांवर टीका केली. आमदाराच्या सुनेला जनतेने नाकारले असून, जनतेचा मूड बदलत असल्याचे चित्र दिसत आहे, असा दावा त्यांनी केला.
2029 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष वाढेल, असा राजकीय अंदाजही त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर सक्षम पर्याय म्हणून जनतेकडून आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा आणि पसंती मिळत असल्याचेही भोईर यांनी सांगितले.