रायगड : रायगडच्या सुधागड तालुक्यातील नेरे गावच्या बस स्टॉपजवळ एका अत्यंत धक्कादायक आणि कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या घटनेत, गावातील कायदा सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेकडे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचलं दलाल यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीवर जलद व कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत नथुराम पोकळे (वय ४२ वर्ष, रा. नेरे, पो. घोटावडे, ता. सुधागड) हे नेरे गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. १० जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पोकळे हे नेरे गावच्या बस स्टॉपजवळ उभे होते. यावेळी आधी केलेल्या एका तक्रारीचा जुना राग मनात धरून तीन मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांना अडवले. त्यामध्ये अनिकेत अनंत पाठारे याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने पोलीस पाटलांच्या कपाळावर आणि हातावर जोरदार वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. तर दुसरा तरुण रोहन रोहिदास राऊत याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोळ्यावर व पोटावर मारहाण केली. हल्ला एवढ्यावरच थांबला नाही. तिसरा तरुण आदित्य अनिल पाठारे याने पोलीस पाटलांना ओढाताण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून नुकसान केले, तर मिहीर मनोहर पाठारे याने त्यांना जमिनीवर खाली पाडले.

त्यानंतर ऋषिकेश अनिल पाठारे, सुधीर सिताराम पोकळे, साहिल शरद पोकळे आणि अनिल चिंधु पाठारे यांनी संगनमत करून इको गाडीतून येत पोलीस पाटलांना अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या हातातील मोबाईल जमिनीवर फेकून तोडून टाकला. तसेच चंद्रकांत पोकळे यांच्या खिशातील साडेपाच हजार रुपये झटापटीत खाली पडून नुकसान झाले. या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुण गटातील व्यक्तींनी देखील पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची जांभूळपाडा दूरक्षेत्र पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पाटलावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण सुधागड तालुक्यात सध्या तणावाचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

बाईट 1 जखमी पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे

बाईट 2 जखमी पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांचे कुटुंबीय