चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथील श्री यशवंत उर्फ राजा बर्वे यांनी लिहिलेल्या इरसाल कोकणरंग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, रविवार दि. 31 मे 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता, चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
वाचनालयाच्या वतीने प्रवचनकार श्री. धनंजय चितळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात, दै. सकाळच्या रत्नागिरी आवृत्तीचे माजी प्रमुख आणि जेष्ठ पत्रकार श्री. शिरीष दामले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्री. राजाभाऊ बर्वे यांनी, त्यांना भेटलेल्या अनेक लोकांपैकी चाळीस पेक्षा अधिक कोकणातील इरसाल व्यतिमत्वाचा वेध, व्यक्तीचित्रांच्या माध्यमातून आपल्या पुस्तकात घेतला आहे. या सोबतच सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वीचे कोकण, कोकणातली निसर्ग, प्रथा, परंपरा, लोकांचे राहणीमान, आहार विहार, विचार या साऱ्याचे नकळत दर्शन हे पुस्तक वाचताना नकळत आपल्याला घडते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयातर्फे कार्याध्यक्ष श्री. अरुण इंगवले, सहकार्यवाह श्री. विनायक ओक आणि श्री. प्रकाश देशपांडे यांनी केले आहे.