चिपळूण : इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी शुभेच्छा देताना नामदार आठवले यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली आणि मी उद्धव ठाकरेंना सोडून महायुतीत सहभागी झाल्यामुळे भास्कर जाधव यांनी आता तिथे राहण्याचे काही कारण उरले नाही अशी टिप्पणी करून सभागृहात हास्याचे फवारे निर्माण केले.

यामध्ये राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल नामदार रामदास आठवले यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये उद्योजक राजू साहेब जोशी, सपना यादव आणि अपूर्वा मुलाणे यांचा सन्मान करण्यात आला. व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक डॉ. रोहित गायकवाड यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला नामदार रामदास आठवले यांच्यासमवेत आमदार भास्कर शेठ जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिक्षणतज्ज्ञ अभिजीत हेग शेट्टी, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, संदेश मोहिते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण रिपाइं अध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, राजू जाधव, नगरसेवक शशिकांत मोदी आदी उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक ज्ञानोबा कदम लिखित ‘महाराष्ट्राची जडणघडण आणि संत परंपरा’ तसेच ‘कोकणातील बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा’ या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भास्कर शेठ जाधव यांनी आमच्यासोबत यावे; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची ऑफर
दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चारोळ्यांचा वापर करून सभागृहात वातावरण हलकेफुलके केले. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.
“सध्या कोण कुठे जाईल, याचा भरोसा नाही. मीसुद्धा भाजप-शिवसेनेसोबत जाईन, असे कोणाला वाटले नव्हते. मात्र, काही कारणास्तव मला जावे लागले. याआधी मी उद्धव ठाकरेंसोबतदेखील होतो आणि आता भाजपसोबत गेलो आहे,” असे रामदास आठवले म्हणाले.
“मी तिकडे गेलो असल्यामुळे भास्कर शेठ जाधव यांनीदेखील तिकडे राहू नये. त्यांनीसुद्धा आमच्यासोबत यावे,” अशी ऑफर यावेळी रामदास आठवले यांनी आमदार भास्कर शेठ जाधव यांना दिली.
यावेळी आठवले म्हणाले की, “ज्यावेळेस काँग्रेस पक्षाची हवा गेली, त्यानंतर मी त्यांना सोडून दिले. मग मी भाजपमध्ये गेल्यानंतर आता भाजपची हवा आहे. मी ज्या पक्षासोबत जातो, तो सत्तेत येतो. पक्ष छोटा असला तरी निवडणुकीत कोणाला पाडायचे आणि कोणाला जिंकवायचे, हे मात्र माझ्या हातात आहे.”
गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. सर्व समाजघटकांना सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. मात्र, संसदेत जागा वाढवून हे आरक्षण देण्यात यावे, अशी आपण मागणी करीत असल्याचेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.