मुंबई : भारतीय जनता पक्षाची पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याला अनेक वर्ष विरोध केला. ते तिरंग्याला अपशकूनी मानत होते, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा काहीही सहभाग नव्हता तसेच स्वातंत्र्यानंतर ५०-५५ वर्ष आरएसएसने तिरंगा झेंडा आपल्या कार्यालयावर फडकवलाही नाही, आज त्यांना तिरंग्याचे प्रेम वाटत असेल तर हे स्वागतार्हच आहे, ‘देर आये दुरुस्त आये’, पण यामागे भाजपा व आरएसएसचा काही कावा नसावा, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीचे एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमीटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच राज्यातील राजकीय, सामाजिक व इतर महत्वाच्या प्रश्नांवर तसेच रणनितीवरही चर्चा करण्यात आली. यापुढे दर महिन्याला अशाच पद्धतीने बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत SIR वरही चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ६५ हजार बीएलए–२ नियुक्त केले आहेत तर बीएलए-१ सुद्धा नियुक्त केले आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे, महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जातीपातीच्या व धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. परंतु भाजपा महायुती सरकारचा हा डाव काँग्रेस हाणून पाडेल व जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल, असे सपकाळ यांनी सांगितले.