चिपळूण : भगवा म्हणजे केवळ हातातील ध्वज नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची जबाबदारी. हाच भगवा विचार पुढे नेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण तालुका युवती अधिकारीपदी सौ. तीर्था मंदार लाड यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीबद्दल त्यांचा शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तीर्था लाड यांच्या परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन आपुलकीने स्वागत करण्यात आले. नव्या जबाबदारीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला लाभलेली मान्यवरांची उपस्थिती ही कुटुंबीयांसाठीही आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.
तीर्था लाड यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण तालुक्यातील युवती सेनेच्या संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पक्षाच्या विचारांशी निष्ठा, संघटनात्मक कामाची जाण आणि समाजहिताची बांधिलकी यांची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. महिलांचे आणि युवतींचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याबरोबरच नव्या पिढीला शिवसेनेच्या भगव्या विचारांशी जोडण्याचे आव्हान आता त्यांच्या खांद्यावर आहे.
यावेळी युवती सेनेच्या नवनियुक्त उपतालुका युवती अधिकारी श्रीया खेडेकर यांचेही तीर्था लाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. नव्या जबाबदाऱ्यांची ही सांगड घालत युवती सेनेच्या संघटनात्मक वाटचालीत नव्या नेतृत्वाची भर पडत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी तीर्था लाड यांचे अभिनंदन करत वडीलकीच्या नात्याने त्यांना चांगले काम करण्याचा सल्ला दिला. “तुमच्यावर सोपविलेली जबाबदारी ही केवळ पदाची नाही, तर जनतेशी जोडलेली जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडा आणि चांगले काम करा,” अशा शब्दांत त्यांनी तीर्था लाड यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित पदाधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना भास्करराव जाधव यांनी “आता सर्व जनतेला प्रभू श्रीराम पावले आहेत त्यांच्या कृपादृष्टीने सर्वांना न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता सर्वांना नक्कीच न्याय मिळेल,” असे सूचक राजकीय भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
