चिपळूण : तालुक्यातील अवैध दारूधंदे, गोवा बनावटीचे मद्य, गांजा व अमली पदार्थांची विक्री बंद करावी तसेच अवैध धंद्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राजाराम जाधव यांनी काल दि. 15 ऑगस्ट पासून पुकारलेले आमरण उपोषण प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
चिपळूण तालुक्यात गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री बंद करणे, गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर विक्री रोखणे, गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता मोठे हातभट्टी चालक, पुरवठादार व अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कारवाई यासह विविध मागण्या करण्यात केल्या होत्या. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चिपळूण विभागाचे निरिक्षक सुनिल 15 ऑगस्ट रोजी जाधव यांना पत्र देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. या पत्रात चिपळूण तालुक्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच अमली पदार्थांच्या धंद्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी लेखी हमी दिली आहे.
तालुक्यात अवैध दारू व अमली पदार्थांच्या धंद्यांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी विभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांच्या गोपनीय तक्रारींसाठी शासनाची ‌‘आपले सरकार‌’ तक्रार निवारण प्रणाली आणि विभागाचे सुविधा पोर्टल उपलब्ध असल्याचे पत्रात नमूद आहे.
शाळा, महाविद्यालये व युवकांची वर्दळ असलेल्या परिसरात वेळोवेळी गस्त व विशेष तपासणी करून अवैध दारू व अमली पदार्थांची विक्री होणार नाही, यासाठी दक्षता घेऊन कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. या कामासाठी एक महिन्याची मुदत देण्यात यावी, अशी विनंती विभागाने केली आहे. प्रांत अधिकाऱ्यांकडून तसेच प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रवीण जाधव यांनी आपले उपोषण स्थगित केले. दरम्यान या आंदोलनाला अनेक जणांनी पाठींबा दिला होता.