जळगाव :- कांदळवन असणारी, फ्लेमींगोंचा अधिवास असणारी ठाण्यातील १४३ एकर जमीन विकासाच्या घशात घालण्याचा डाव कुणी तरी आखला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. नेमकं कोण कुणाच्या फायद्यासाठी कोण काम करत आहे हे समोर आले पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.

रोहिणी खडसे यांनी याबाबत एक बातमी शेअर केली आहे. त्याबाबत सविस्तर बोलताना त्या म्हणाल्या की,
एकीकडे भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड चालवली जात असल्याचा वाद ताजा असतानाच आता ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील १४३ एकर जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामधून वगळण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. कारण हा केवळ १४३ एकर जमिनीचा प्रश्न नाही; हा आपल्या पर्यावरणाचा, जैवविविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांचा प्रश्न आहे असं त्या म्हणाल्या.

फ्लेमिंगो पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. महाराष्ट्रातील मोजक्या ठिकाणी दिसणाऱ्या या सुंदर स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवासच जर तथाकथित विकासाच्या नावाखाली बिल्डरांच्या फायद्यासाठी मोकळे करून दिले जात असतील तर येणाऱ्या पिढीला काँक्रीटचे जंगल आणि धुळीच्या साम्राज्याशिवाय काहीच दिसणार नाही अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरण वाचवण्याऐवजी संवेदनशील क्षेत्रांची व्याप्ती कमी करण्याचे प्रस्ताव का आणले जात आहेत? सरकारने या प्रस्तावावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि १४३ एकर क्षेत्राला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामधून वगळण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केली.