नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून, या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांविषयी वापरण्यात आलेली भाषा भारतीय राजकीय संस्कृती, लोकशाहीची प्रतिष्ठा आणि राजकीय सभ्यतेला शोभणारी नाही, असे मत ॲड. मेश्राम यांनी व्यक्त केले. लोकशाहीमध्ये सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र टीका करताना भाषेची मर्यादा आणि पदाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अधिक संयमित आणि जबाबदार वक्तव्याची अपेक्षा असते. राजकीय विरोध हा वैचारिक मुद्द्यांवर आधारित असावा, वैयक्तिक टीकेवर नव्हे. केवळ वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय चर्चा घडवून आणण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मेश्राम म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी मुद्दे आणि तथ्यांचा आधार घ्यावा. राजकीय विरोधाच्या नावाखाली सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे योग्य नाही. राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाविषयी बोलताना किमान राजकीय शिष्टाचाराचे भान राखलेच पाहिजे,” अशी भूमिका ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मांडली.

राजकारणात शब्दांपेक्षा विचारांची उंची आणि आरोपांपेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सार्वजनिक वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहनही मेश्राम यांनी केले.