मुंबई : वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या केवळ एका जागेचा निर्णय घेताना नाकीनऊ आलेल्या महाविकास आघाडीची कॉमेडी सर्कस पाहून या आघाडीला घरी बसवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता आनंदी आणि समाधानी आहे. विधान परिषदेच्या जागेवर नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची हे कळत नाही त्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी वाभाडे काढले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
सातत्याने राज्य काँग्रेसच्या नेत्यांचा अपमान करणे, हर्षवर्धन सपकाळ यांना गृहीत धरणे, नाना पटोले यांना न विचारणे, विजय वडेट्टीवारांना किंमत न देणे हे संजय राऊत यांचे धोरण आहे. संजय राऊत सांगतात की राहुल गांधींसोबत आमचे उत्तम संबंध आहेत आणि आम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना विचारत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आता विधान परिषदेसाठी जेव्हा आपला उमेदवार घोषित करतील तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि येत्या दोन वर्षांत जेव्हा तुमची राज्यसभेची निवडणूक असेल तेव्हा काँग्रेस तुम्हाला निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांना महाराष्ट्रातल्या जनतेने धडा शिकवलाय. ते एकदाही जनतेतून निवडून येऊ शकले नाहीत मुंबईतल्या महापालिकेतील एखादा वार्ड जिंकून आणता आला नाही अशी संजय राऊत यांची स्वतःची अवस्था आहे त्यामुळे संजय राऊत, इतरांवर टीकाटिकपणे करण्यापेक्षा स्वतःचा आत्मपरीक्षण केले तर बरे होईल, असे श्री. बन यांनी ठणकावले.