चिपळूण : प्रख्यात उद्योजक श्री. राजूसाहेब तथा प्रशांत जोशी यांना इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे जाहीर करण्यात आलेला राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार (२०२६) आज, रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि लेखक-दिग्दर्शक-अभिनेते श्रीरंग गोडबोले यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रसेवा दलाचे अभिजित हेगशेट्ये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राजूसाहेब जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे. संशोधन क्षेत्रासाठी प्रा. डॉ. धनाजी थोरे, शिक्षण क्षेत्रासाठी प्रा. डॉ. रोहित गायकवाड आणि सहकार क्षेत्रासाठी सौ. अपूर्वा मुलाणी, सौ. स्वप्ना यादव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम लिखित व संपादित पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.

उद्योगक्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारे राजूसाहेब जोशी यांना राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाल्यापासून चिपळूणसह विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज पुरस्कार प्रदान होत असल्याने त्यांच्या समर्थक, हितचिंतक आणि मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इंडियन स्टुडंट कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम आणि उपाध्यक्षा प्रा. माधुरी राऊत यांनी केले आहे.