मुंबई : पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा करण्यासाठी पक्ष संघटनेत लवकरच बदल करण्यात येणार असून, त्यानंतर राज्यभर दौरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून जिल्हास्तरावर काही बदल करण्यात येणार आहेत. नव्या जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निर्णय घेतले जातील. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन करण्यात येईल, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी एकत्रित आंदोलने आणि संयुक्त दौरे करावेत, अशी सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने एकत्रितपणे जनतेसमोर जाणे गरजेचे आहे, असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सत्तेची धुंदी चढल्यानंतर काही जण कोणालाही न जुमानणारी भाषा वापरतात. पत्रकारांनाही दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संजय राऊत बॉम्ब टाकण्याची किंवा मारून टाकण्याची भाषा करत नाहीत. मात्र, सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडूनही अशा प्रकारची वक्तव्ये होत आहेत, असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्यावर दबाव आल्यामुळे बैठक झाली नसावी, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.