रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सण-उत्सव, विविध संघटनांची आंदोलने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
१२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून २६ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात लागू राहणार आहेत.
सण-उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
नवरात्रोत्सव, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा या सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी सुरू असलेली आंदोलने लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामासह विविध औद्योगिक प्रकल्पांबाबत सुरू असलेली आंदोलने, तसेच सामाजिक व आरक्षणविषयक मुद्द्यांवरून निर्माण होण्याची शक्यता असलेला तणाव विचारात घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
या गोष्टींवर राहणार बंदी
▪️ तलवार, बंदूक, सुरा, लाठी, सोटे किंवा दुखापत करण्यासाठी वापरता येणारी शस्त्रे सोबत बाळगणे.
▪️ ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे.
▪️ दगड किंवा इतर फेकण्यायोग्य वस्तू जमा करणे अथवा तयार करणे.
▪️ शांतता भंग होईल अशी भाषणे, घोषणा, गाणी किंवा वाद्यांचा वापर करणे.
▪️ सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कृती करणे.
▪️ सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे.

मोर्चा, मिरवणुकीसाठी पूर्वपरवानगी आवश्यक
या कालावधीत मोर्चा, मिरवणूक किंवा सभा आयोजित करायची असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
कोणाला मिळाली आहे सूट?
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी तसेच सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे व नाट्यगृहे यांना आदेशातून सूट देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.