सावर्डे : सामाजिक जीवन कौशल्य (Social Life Skill) या विषयांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारातील झाडांवरून जमिनीवर पडलेली सुकलेली पाने गोळा केली.
गोळा केलेल्या पानांमध्ये पुढील दोन महिन्यांत माती, शेणखत आणि पाणी मिसळून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. तयार झालेले हे खत येत्या जून महिन्यात कॉलेजमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.
ह्या उपक्रमाचे नियोजन प्राचार्य मंगेश भोसले, उपप्राचार्य लांडगे सर, आणि विभाग प्रमुख कुसुमडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. लीना जावकर, प्रा. पल्लवी बोरोले, प्रा. राकेश घाग आणि प्रा. मदन कुंभार यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
