खेड : सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात नव्या पिढीला आपल्या मातीतील पारंपरिक आणि पौष्टिक आहाराची ओळख व्हावी, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळा बिजघर नं. १ येथे नुकताच ‘रानभाज्या महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. या अभिनव उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महोत्सवाची प्रमुख आकर्षणे:

रानभाज्यांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन: विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने परिसरातील जंगल आणि माळरानावरून टाकळा, कुर्डू, फोडशी, कर्टोली, भारंगी, आघाडा, आणि गुळवेल यांसारख्या बहुगुणी रानभाज्या गोळा करून प्रदर्शनात अतिशय सुंदररीत्या मांडल्या होत्या.

 शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना रानभाज्यांचे आहारातील महत्त्व सविस्तर समजावून सांगितले. पावसाळ्यात कोणत्याही रासायनिक खताविना नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या भाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात, यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक शिक्षक समिती आणि शिक्षणप्रेमींनी शाळेच्या या स्तुत्य आणि ज्ञानवर्धक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी बिजघर गावच्या माजी सरपंच शुभांगी भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आकांक्षा जंगम, सामाजिक कार्यकर्ते शुभम गायकवाड कमलेश भोसले,आस्मी भोसले, आशा सेविका सायली शिगण, संगीता घडशी, अर्पणा कदम, सपना कदम, मनीषा खोपकर, कीर्ती मोहिते, योगिता निकम आदी उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले. संदीप घाणेकर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ व संदीप घाणेकर यांनी मेहनत घेतली.