खेड : सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘निरोगी विद्यार्थी, सशक्त भारत’ या संकल्पनेतून स्वयंपूर्तता फाउंडेशन, रत्नागिरीतर्फे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे ‘ॲनिमिया मुक्त भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सर्वप्रथम, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी फुरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रियंका कदम, तसेच स्वयंपूर्तता फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर स्वस्तिक रामबाडे व विक्रांत सुर्वे यांचे पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केले.
शिबिरादरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना योग्य आहार, पोषणमूल्ये आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या उपक्रमासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासनाने स्वयंपूर्तता फाउंडेशन तसेच आरोग्य यंत्रणेचे आभार मानले.
यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, पूर्वमाध्यमिक विभागप्रमुख सौ. देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
रोटरी स्कूलचे चेअरमन मा. डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी सदर शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
