मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी शिक्षकांना पगारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी हे पत्र पाठवले आहे.

पूर्वी शिक्षक ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असत, त्याच संस्थांमध्ये मतदान केंद्रे असत. मात्र, यंदा तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना निवडणुकीच्या दिवशी सुट्टी नसल्याने अनेक शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावणे शक्य होणार नाही.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मत महत्त्वाचे असून, शिक्षकांसारख्या सुजाण घटकाला मतदानापासून वंचित राहावे लागणे योग्य नाही. त्यामुळे शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने आवश्यक निर्णय घेऊन मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.