कापरे : दिवाळीचा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाची मात, आनंदाची उधळण आणि चैतन्याची पर्वणी. या पावन पर्वावर कापरे गावचे ग्रामदैवत श्री देव नागार्जुन मंदिराच्या प्रांगणात नुकताच ‘युवा स्वर’ दीपावली प्रभात कार्यक्रम संपन्न झाला. भक्ती, कला आणि संगीताचा अनोखा त्रिवेणी संगम या मैफीलीत पाहायला मिळाला. मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. पहाटेच्या शांत वातावरणात अनेक उपस्थित मंत्रमुग्ध होऊन गेले. गावातील प्रतिभावान सुपुत्र कु. स्वराज संतोष साळुंके आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या सुरेल कलाकारी आणि भावगीतांची मैफिल या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले.

कुमार स्वराज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अत्यंत तालासुरात सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस भावगीतांनी आणि सुमधुर संगीताने उपस्थितांची मने जिंकून घेतली. त्यांच्या प्रत्येक गाण्यावर ग्रामस्थांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली. देवस्थान कमिटीच्या अथक परिश्रमांमुळे व नियोजनानेच हे शक्य झाले. यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंत मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. देवस्थान कमिटीचे सल्लागार बळीराम मोरे यांचा बहुमोल सल्ला या कार्यक्रमाच्या यशस्वितेत अत्यंत महत्त्वाचा ठरला. आपल्या लाडक्या ग्रामदैवताच्या चरणी दिवाळीच्या सकाळच्या प्रहरी अशा प्रकारचा सांस्कृतिक सोहळा संपन्न करणाऱ्या संपूर्ण देवस्थान कमिटीचे कापरे ग्रामस्थांनी व रसिकांनी धन्यवाद व्यक्त करून तरुणांसाठी असे व्यासपीठ भविष्यातही उपलब्ध करून सांस्कृतिक परंपरा जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली.