चिपळूण : आला रे आला… गोविंदा आला! ढोल-ताशांचा गजर, भगव्या जल्लोषाची ऊर्जा, शिवसैनिकांची एकजूट आणि त्याला लाभलेली निष्ठेची किनार अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका/शहर आयोजित ‘निष्ठावंतांची दहीहंडी २०२६’ उत्साहात संपन्न झाली. यावेळी चिपळूण महिला आघाडी आणि युवती सेनेच्या महिला शिवसैनिकांनी दहीहंडीचे पूजन केले.

दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडण्याचा उत्सव नव्हे; एकमेकांच्या खांद्यावर विश्वास ठेवून ध्येय गाठण्याची शिकवण देणारा उत्सव. याच भावनेला राजकीय आणि संघटनात्मक आशयाची जोड देत चिपळूणमध्ये साजऱ्या झालेल्या या दहीहंडीला ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ असे सार्थ नाव देण्यात आले. सत्तेच्या वाऱ्याची दिशा बदलली तरी विचारांशी, भगव्याशी आणि शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या शिवसैनिकांच्या बांधिलकीचा हा उत्सव ठरला.

दहीहंडीच्या उत्साहाला लाभली कोकणी लोककलेची धार!

दहीहंडीच्या जल्लोषासोबतच यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘कलगीतुरा महासंग्राम’! शिवसेना नेते व आमदार भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते कलगीतुरा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाहीर शाहिद खेरटकर आणि शाहीर सुभाष बावदाने यांच्या दमदार सादरीकरणाने कोकणच्या मातीत रुजलेली लोककला अक्षरशः जिवंत झाली.

ढोल-ताशांच्या गजरात शब्दांचे बाण सुटले आणि रंगला कलगीतुरा महासंग्राम! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी केलेले योगदान, तसेच पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी करीत असलेला संघर्ष आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा जागर या कोकणी लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला.

आपल्या मातीत रुजलेल्या संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा सन्मान करतानाच शिवसेनेच्या वैचारिक प्रवासाची आणि निष्ठेची कहाणी सांगणारा हा कलगीतुरा ठरला.

‘पक्ष पळवला, निशाणी पळवली; तरी शिवसेना संपत नाही!’

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार भास्करराव जाधव यांनी ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ या नावामागील भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेच्या संघर्षाचा संदर्भ मांडला.

“२०२२ सालापासून शिवसेनाप्रमुखांची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायचीच, असा चंग बांधला गेला. हा विडा विरोधकांनी उचललेला नाही, तर ज्यांच्याबरोबर शिवसेनेने ३५ वर्षे निष्ठेने मैत्री निभावली, त्या मित्रांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सातत्याने केले,” असे सांगत त्यांनी आमदार पळवले, पक्ष पळवला, निशाणी पळवली, खासदार पळवले आणि प्रमुख पदाधिकारी पळवले, तरीदेखील शिवसेना संपली नसल्याचे अधोरेखित केले.

शिवसेनेचा शेवटचा तळागाळातील कार्यकर्ता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी किती जोडलेला आहे आणि किती ताकदीने पाय रोवून उभा आहे, याचे ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

“म्हणून ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ हा शब्दप्रयोग आणि हे नाव शंभर टक्के उचित आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी दहीहंडी उत्सवाच्या पवित्र भावनेलाही उजाळा दिला.

पूर्वीच्या काळी ज्याच्या घरी दही-दूध असे तो श्रीमंत समजला जायचा. आज त्याच दही-दुधाचा काला आपण दहीहंडीमध्ये घालतो, असे सांगत त्यांनी दहीहंडीच्या थरांची सांगड संघटनात्मक एकजुटीशी घातली.

“ज्याप्रमाणे दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण एकमेकांच्या खांद्याचा आधार घेत थर चढवत जातो, त्याचप्रमाणे आज सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे. ही दहीहंडी यशस्वी करण्यासाठी ज्या-ज्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत आणि कष्ट घेतले, त्या सर्वांचे आभार,” असे सांगत त्यांनी हीच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.

‘एकजुटीतूनच चांगले दिवस येतील’ – जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम

जिल्हाप्रमुख (रत्नागिरी दक्षिण) दत्ताजी कदम यांनीही यावेळी ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ हा सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने पक्षाची बांधिलकी जोपासत राबविण्यात आलेला चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.

सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानताना त्यांनी सर्वसामान्य जनतेने पक्षाच्या या कार्यक्रमाला सढळ हाताने केलेले सहकार्य, तसेच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि पत्रकार बांधवांचे विशेष आभार मानले.

“अशा निष्ठापूर्ण कार्यक्रमातूनच चांगले दिवस येतील. इथून पुढेही जनतेसाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे आणि ही बांधिलकी जपली पाहिजे,” असे आवाहन दत्ताजी कदम यांनी केले.

पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थिती

या सोहळ्यास रत्नागिरी जिल्हाप्रमुख (रत्नागिरी उत्तर) तथा गटनेता जिल्हा परिषद, विक्रांत जाधव, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक (रत्नागिरी दक्षिण) रविंद्र डोळस,
आमदार शेखर निकम सर, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, चिपळूण प्रांतअधिकारी आकाश लिगाडे, चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, माजी आमदार रमेशभाई कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव तसेच आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व पत्रकार बांधव व सर्वच पक्षातील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख, चिपळूण तालुका प्रमुख (दक्षिण व उत्तर), चिपळूण शहर प्रमुख, उपजिल्हा महिला संघटक, चिपळूण सहसंपर्कप्रमुख, उपजिल्हा युवती अधिकारी, चिपळूण महिला तालुका संघटक, चिपळूण युवासेना तालुका अधिकारी, चिपळूण महिला शहर संघटक,चिपळूण युवासेना शहर अधिकारी, चिपळूण तालुका युवती अधिकारी, तसेच संपूर्ण चिपळूण तालुका आणि शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व युवती सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सर्व उपतालुकाप्रमुख, सर्व उपशहर प्रमुख, सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभाग प्रमुख, सर्व शाखाप्रमुख, सर्व उपशाखाप्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली.

हंडी फुटली… पण निष्ठेचा थर कायम राहिला!

चिपळूणमधील ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ने यंदा केवळ उत्सवाचा जल्लोष केला नाही, तर संघर्षाच्या काळातही विचारांशी आणि संघटनेशी जोडून राहिलेल्या शिवसैनिकांच्या निष्ठेला सलाम केला.

दहीहंडीच्या प्रत्येक थराला जसा दुसऱ्या थराचा आधार असतो, तशीच संघटनेची ताकद एकजुटीत आणि निष्ठेत असते, हा संदेश या उत्सवातून अधोरेखित झाला.

थर दहीहंडीचे होते… जल्लोष उत्सवाचा होता… शब्दांचा महासंग्राम कलगीतुऱ्याचा होता… पण या संपूर्ण सोहळ्याची खरी उंची होती… निष्ठेची!

‘निष्ठावंतांची दहीहंडी २०२६’ –
चिपळूणच्या मातीत निष्ठेचा भगवा जागवत संपन्न झालेला एक अविस्मरणीय उत्सव!