चिपळूण : प्रख्यात उद्योजक श्री. राजूसाहेब तथा प्रशांत जोशी यांना इंडियन स्टुडन्ट कौन्सिलचा राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार (२०२६) जाहीर झाला आहे. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याची दखल घेऊन इंडियन स्टुडन्ट कौन्सिलतर्फे त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.

उद्योजक श्री. राजूसाहेब जोशी यांच्यासह संशोधन क्षेत्रातून प्रा. डॉ. धनाजी थोरे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रा. डॉ. रोहित गायकवाड तर सहकार क्षेत्रामधून सौ. अपूर्वा मुलाणी यांनाही राज्यस्तरीय पुरस्कार त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री श्री. रामदास आठवले व लेखक दिग्दर्शक अभिनेता श्रीरंग गोडबोले यांनाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार हुसेनभाई दलवाई भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूणचे आमदार शेखर निकम, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रसेवा दलाचे अभिजित हेगशेट्ये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रा. डॉ.ज्ञानोबा कदम लिखित व संपादित पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंडियन स्टुडन्ट कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम व उपाध्यक्षा प्रा. माधुरी राऊत यांनी केले आहे.

या पुरस्काराच्या वृत्तामुळे उद्योजक श्री. राजूसाहेब जोशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.