मुंबई, दि. १७ : विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० लहान विद्यार्थ्यांनी आज विधानभवनाला अभ्यासक भेट दिली. या भेटीदरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी बालविद्यार्थ्यांशी साधलेला संवाद विशेष आकर्षण ठरला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अतिशय सोप्या आणि लहान मुलांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. “जशी शाळेत शिस्त पाळून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते, तसेच विधानभवनातही नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियम मोडल्यास इथेही शिक्षा होते,” असे सांगत त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ सभागृह, सदस्यांची रचना आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत रंजक उदाहरणांसह माहिती दिली.