चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील उच्च शिक्षणाचा विस्तार तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाविद्यालये व नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांसाठी नवीन अभ्यासक्रम नोंदणीची आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार आ. शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ. निकम यांनी यासंदर्भात मागणी करताना, मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक, अद्ययावत आणि रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
मुंबई विद्यापीठाने Data Science & Sport Studies, Artificial Intelligence (AI) & Sports Analytics यांसारखे आधुनिक आणि भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त अभ्यासक्रम विकसित केले आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण तसेच क्रीडा क्षेत्रातील बदलत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेता अशा अभ्यासक्रमांना विशेष महत्त्व आहे. हे अभ्यासक्रम कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातच उपलब्ध झाल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळू शकते, असे आ. निकम यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाने आपला अधिकृत बृहत आराखडा (Perspective Plan) शासनाकडे सादर केलेला आहे. त्यामुळे या आराखड्याच्या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाईन प्रक्रिया सुलभ व गतिमान होणे गरजेचे आहे. सध्या नवीन अभ्यासक्रम नोंदणीच्या ऑनलाईन पोर्टलवर मुंबई विद्यापीठासाठी आवश्यक लिंक व सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कोकणातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे किंवा अन्य मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागते. आर्थिक परिस्थिती, प्रवासाचा खर्च तसेच निवासाच्या अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रम निवडणे शक्य होत नाही. त्यामुळे गावाजवळच आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच स्थानिक पातळीवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होण्यासही मदत होईल.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नवीन अभ्यासक्रम नोंदणी पोर्टलवर मुंबई विद्यापीठासाठी आवश्यक लिंक व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी केली आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही आ. निकम यांनी नमूद केले.
