चिपळूण : डी.बी.जे. महाविद्यालयाची अत्यंत गुणी, मेहनती आणि जिद्दी खेळाडू कु. तन्वी भूषण रेडिज हिने अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत वरिष्ठ गटात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे.

आज छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची परंपरा जपणाऱ्या या भूमीने पुन्हा एकदा जगाला सांगितले आहे की, कोकणातील लेकरं संधीची वाट पाहत नाहीत ती स्वतःचा मार्ग निर्माण करतात आणि जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडतात.

या सुवर्ण यशामागे तिच्या आई-वडिलांचे, संस्कार, त्याग, आशीर्वाद व खंबीर पाठबळ आणि योग प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कष्टांचे आणि तन्वीच्या वर्षानुवर्षांच्या योगसाधनेचे आज सोनं झालं आहे.

लोटेच्या भूमीतून निघालेली ही सुवर्णकन्या आज लाखो युवक-युवतींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या या यशाने कोकणच्या प्रत्येक घरात अभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे. अशी प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली.

कु. तन्वी भूषण रेडिज, तुझ्या या ऐतिहासिक आणि सुवर्ण कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तुझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. अशीच भरारी घेत राहा, नवनवे विक्रम प्रस्थापित करत राहा आणि देशाचा तिरंगा जगाच्या सर्वोच्च शिखरांवर अभिमानाने फडकवत राहा अशा शुभेच्छा तिला रत्नागिरी जिल्ह्यातून दिला जात आहे.