अलिबाग : “जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर आपल्या हक्कांची, अस्मितेची आणि संस्कृतीची जपणूक करण्याचा दिवस आहे. आदिवासी समाजाने आपली पारंपरिक संस्कृती, कला आणि रूढी-परंपरा जपत शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात पुढे गेले पाहिजे. शासनाच्या विविध योजना आणि संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येक आदिवासी बांधवापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठीच माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर उर्फ (छोटम शेठ )यांच्या पुढाकाराने भव्य अशा जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन केले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी आज अलिबाग शहरात एकत्र येत भव्य रॅली काढली आणि जाहीर सभा घेतली. मात्र, या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह एकाही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने हजेरी न लावल्याने आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करत, आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून, वाड्या-वस्त्यांवरून हजारो आदिवासी बांधव, महिला आणि तरुण अलिबाग शहरात दाखल झाले होते. पारंपरिक पोशाख, वाद्ये आणि घोषणांच्या गजरात अलिबाग शहरातून एक भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रूपांतर नंतर जाहीर सभेत झाले. आपल्या हक्क आणि मागण्यांसाठी संपूर्ण जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची एकजूट, स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारसा संपूर्ण समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. ‘उठ आदिवासी जागा हो, या क्रांतीचा धागा हो’ या संदेशातून आपल्या हक्कांसाठी आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एकत्र येऊया. असा निर्धार यावेळी करण्यात आला.
