लोटे : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवामध्ये घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक उंचावला.
मराठी कथाकथन स्पर्धेत सार्थक जाधव याने द्वितीय क्रमांक मिळविला. क्ले मॉडेलिंग स्पर्धेत शिवम कदम याने द्वितीय क्रमांक पटकावला. शास्त्रीय तालवाद्य एकल स्पर्धेत गंधार संकपाळ याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर शास्त्रीय स्वरवाद्य एकल स्पर्धेत श्रावणी संकपाळ हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
एकांकिका स्पर्धेत सुयश शिवलकर, साक्षी तारकर, रिद्धि जोशी, सागर कुडकर ,अल्पेश सकपाळ, श्रावणी संकपाळ, कुणाल पाटील, चैतन्य कदम, सार्थक सावंत तसेच सार्थक कोटकर या विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला.
वक्तृत्व स्पर्धा (गट अ) मध्ये आदित्य गमरे आणि वक्तृत्व स्पर्धा (गट ब) मध्ये सलोनी म्हादलेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.भारतीय सुगम गायन स्पर्धेत स्वराज साळुंखे, भारतीय शास्त्रीय नृत्य (एकल) स्पर्धेत मनस्वी शिरकर, तसेच पाश्चात्य समूहगायन स्पर्धेत आर्यन खेडेकर, चिन्मय कोकाटे, सलोनी चव्हाण, वेदांत शिंदे, अनुज शिरसागर, गंधार संकपाळ आणि श्रवण मयेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.या युवा महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कन्साई नेरोलैक पेंट्स लिमिटेड चे वर्क्स मैनेजर श्री. प्रशांत ढमढेरे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. निलेश सावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या दैदिप्यमान यशाबद्दल घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेलचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील आणि उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य आणि ललित कला क्षेत्रातही संस्थेचा लौकिक वाढविल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, आगामी स्पर्धांमध्येही अशीच यशस्वी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.