लोटे : रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी अनुवादित केलेल्या इकबाल मुकादम यांच्या ‘ती माणसे गेली कुठे?’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ८ रोजी तमिळ संघम हॉल,वाशी, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
इकबाल मुकादम लिखित ‘ती माणसे गेली कुठे?’ या मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘Waves and Whispers ‘ रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केला व अवेश्री प्रकाशन-रत्नागिरी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.वाशी- नवी मुंबई येथील तमिळ संगम या सभागृहात अनेक क्षेत्रातील जाणकार रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चिपळूणचे मान्यवर लेखक रफीक दलवाई हे लाभले होते. शिवाय तळोजाचे समाजसेवक नौफिल सैयद तसेच नवी मुंबई येथील दैनिक पुढारीचे प्रमुख श्री राजेश नाईक पाहुणे म्हणून लाभले होते. पुस्तकाचे अनावरण नुमाया मुकादम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सुधीर कदम, गौतम वैद्य, मझर शेख हेही स्थानांपन्न झाले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन निशात मुकादम यांनी केले. कुराण आयत आणि लगेचच राष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमात कोलथरे येथून श्री. दीपक महाजन उपस्थित राहिले. खेड येथून पत्रकार ज्ञानेश्वर रोकडे हेही आले होते. स्थानिक शैक्षणिक संस्थासाठी भेट देण्यासाठी म्हणून त्यांनी इंग्रजी पुस्तकाच्या ५ प्रती विकत घेतल्या. ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, मुंब्रा, कुर्ला तसेच तळोजा येथील काही स्थानिक रसिकांची उपस्थिती होती. ज्यांना एक एक पेन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात बना फाउंडेशन संस्थेच्या वतीने ५ व्यक्तीमत्वांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आरोग्य क्षेत्रात डॉ. कय्युम मुकादम आणि डॉ. सबिहा बालाभाई,कला क्षेत्रात चित्रकार गणेश म्हात्रे आणि संगीत क्षेत्रासाठी मजहर शेख आणि गौतम वैद्य यांनी स्वीकारून संस्थेला उपकृत केले.