रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील ‘१७ मराठा लाईट इन्फंट्री’चे खंबीर जवान दिनेश रामचंद्र सावंत हे सलग ३० वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. या निवृत्तीनिमित्त डोंबिवलीत त्यांच्या भव्य मिरवणुकीसह जंगी नागरी सत्कार सोहळा पार पडला.
श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे सुपुत्र श्री. दिनेश रामचंद्र सावंत यांनी १९९६ मध्ये भारतीय सेनेत प्रवेश केला होता. १७ मराठा रेजिमेंटमध्ये सेवा बजावत त्यांनी देशाच्या विविध आव्हानात्मक सीमांवर अहोरात्र रक्षण केले. ३१ जुलै २०२६ रोजी ते सैन्यदलातून सेवामुक्त झाले.
​त्यांच्या या गौरवशाली सेवापूर्तीचे औचित्य साधून रविवारी, ४ ऑगस्ट २०२६ रोजी डोंबिवली शहरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुशोभित वाहनातून दिनेश सावंत यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. “भारत माता की जय” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमून गेला होता.
या जंगी सोहळ्याला भारतीय सैन्यातील अनेक माजी सैनिक विशेषत्वाने उपस्थित होते. वाकलघर ग्रामविकास मंडळ (मुंबई) चे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. किशोर राऊत, सावंत परिवार तसेच मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावून सैनिकाला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.
​या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अभय शेलार, संजय पवार, योगेश पवार, संदीप ओमले, मयूर शेलार, संदेश ओमले, राजेश ओमले, विनय पवार आणि राकेश ओमले यांनी केले होते. ३० वर्षांच्या देशसेवेनंतर मायभूमीत परतलेल्या या वीर जवानाचा सत्कार करताना संपूर्ण उपस्थितांचे डोळे अभिमानाने भरून आले होते.