गुहागर : पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ताज्या मासळीपासून दूर राहिलेल्या खवय्यांनी गुहागर शहरातील मंडळीवर मासळी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. पावसाळ्यानंतर मच्छीमारीच्या बोटी याच ठिकाणी येऊन लागत असल्याने मंडळीवर मोठ्या प्रमाणात ताजी मासळी उपलब्ध होत आहे.

मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर येथे विविध प्रकारची मासळी विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. मंडळीवर दरवर्षी मासळी खरेदीसाठी गुहागरसह पालशेत, वरवेली, शृंगारतळी, आरे आदी परिसरातून नागरिक येत असतात. त्यामुळे या परिसरात वाहनांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते.

ताजी मासळी मिळत असल्याने सकाळपासूनच खवय्यांची गर्दी मंडळीवर आणि किनाऱ्यालगतच्या परिसरात दिसून येत आहे. मासेमारीच्या बोटी किनाऱ्यावर दाखल होताच ताजी मासळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू होते. त्यामुळे मासेमारी बंदीनंतर गुहागरच्या मंडळीवर पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.