कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर आमदार शेखर निकम यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि या दुःखद प्रसंगी त्यांचे सांत्वन केले.
डॉ. डी. वाय. पाटील हे शिक्षण, समाजसेवा, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तसेच पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेल्या डॉ. पाटील यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्रासह देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रावर अमिट ठसा उमटवला. त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
या भेटीदरम्यान डॉ. डी. वाय. पाटील आणि आमदार शेखर निकम यांच्या १९९०च्या दशकातील जुन्या भेटींच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. त्या काळातील परिचय, संवाद आणि डॉ. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व याबाबतच्या आठवणी यावेळी कुटुंबीयांसोबत शेअर करण्यात आल्या.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. त्यांचे विचार, कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
