लांजा: लांजा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ते कुलकर्णी-काळे छात्रालय या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या खड्डेमय रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने चिखल नांगरणी स्पर्धा ठेवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध करण्यात येणार आहे. या संदर्भात लांजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे युवा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के यांनी यासंदर्भात लांजा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आयटीआय ते कुलकर्णी-काळे छात्रालय या दुतर्फा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच या मार्गावर शाळा, रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती यांसह विविध महत्त्वाची कार्यालये व संस्था आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची तसेच पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला असून यापूर्वी अपघात व जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हायवे विभाग, संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदनातून करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सातत्याने होत असलेल्या गैरसोयीचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आता अनोख्या आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असून त्यामुळे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी लांजा शहरातील प्रमुख रस्त्यावर चिखल नांगरणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. शिवसेना (उबाठा) लांजा तालुका तसेच युवासेनेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करून प्रशासनाचे लक्ष खड्डेमय रस्त्यांकडे वेधण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.