सावर्डे : सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तसेच राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल सन्मान आणि अभिमानाची भावना दृढ करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पोलीस निरीक्षक आबासो पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी कांबळे यांच्या हस्ते तिरंगा रॅलीला उत्साहात सुरुवात करण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातातील डौलाने फडकणारे तिरंगे आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. सह्याद्री शिक्षण संस्था ते सावर्डे बाजारपेठ या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘एकच नारा, भारत प्यारा’, ‘देशासाठी एकच मान, तिरंगा आपला शान’ अशा देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. घोषणांच्या निनादाने सावर्डे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन न करता तिरंग्याचा सन्मान, देशाबद्दलची निष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत, देशाच्या एकात्मतेचे आणि अखंडतेचे महत्त्वही विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तिरंगा रॅलीमुळे परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी प्रा. सुनील जावीर, प्रा. निशिकांत कुरणे, प्रा. दीप्ती शेबेकर व प्रा. अवनी कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. सुनील जावीर यांनी केले.