दापोली :-कै. अरविंद अमृते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, गव्हे* यांच्या वतीने गव्हे ग्रामस्थ तसेच शेतकरी बंधू-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत गव्हे ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, रक्तातील चरबी, दंत तपासणी तसेच नेत्र तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार असून डॉ. सुयोग भागवत यांच्याकडून उपस्थितांना मोफत वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमास भागवत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दापोली, सावरीकर डोळ्यांचा दवाखाना तसेच गव्हे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेता यावी आणि आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी वर्ग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
