नवी दिल्ली : देशातील आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने ४० प्रश्नांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे, या जनगणनेदरम्यान पहिल्यांदाच जातीशी संबंधित माहितीही विचारली जाणार आहे. याशिवाय, कौटुंबिक माहिती, शिक्षण, रोजगार, एवढेच नाही तर कोविड लसीकरणाची माहितीही विचारली जाणार आहे.
केव्हापासून सुरू होणार जनगणना –
देशाचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांच्या आदेशानुसार, जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील बर्फाच्छादित भागांत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जनगणना प्रक्रिया पार पडेल. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यापूर्वी नागरिकांसाठी १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ‘सेल्फ एन्यूमेरेशन’ अर्थात स्वतःच माहिती भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच, देशाच्या उर्वरित भागांमध्ये पुढील वर्षी जनगणना सुरू होईल.
हे महत्वाचे प्रश्न विचारले जाणार? –
जनगणनेदरम्यान, वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळेचे वय, पती/पत्नीचे नाव, धर्म, जात, आई-वडील यांची माहिती, अपंगत्व आणि मातृभाषेसह इतर भाषांचे ज्ञान, साक्षरता, डिजिटल साक्षरता, सर्वोच्च शैक्षणिक पात्रता, गेल्या वर्षभरातील आर्थिक कामे, जन्मस्थान, कोविड लस घेतली आहे की नाही आदी प्रश्न विचारले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे, लोकांनी सांगितलेली जात थेट नोंदवली जाईल, यासाठी पर्यायांची यादी नसेल.
बघा प्रश्नांची संपूर्ण यादी… –
१.व्यक्तीचे नाव
२.कुटुंब प्रमुखाशी असलेले नाते
३.लिंग
४.जन्मतारीख आणि वय
५.सद्य वैवाहिक स्थिती
६.विवाहाच्या वेळचे वय
७.पती/पत्नीचे नाव
८.घोषित राष्ट्रीयत्व
९.धर्म
१०.अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / जात
११.वडिलांचा तपशील
१२.आईचा तपशील
१३.अपंगत्व (दिव्यांगत्व)
१४.मातृभाषा आणि ज्ञान असलेल्या इतर भाषा
१५.साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती
१६.शिक्षण संस्थेतील उपस्थिती/शिक्षणाची स्थिती
१७.सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि शाखा/विषय
१८.गेल्या एका वर्षादरम्यान कधीही काही काम केले आहे का?
१९.आर्थिक उपक्रमांची श्रेणी
२०. व्यवसाय / पेशा
२१.उद्योग, व्यापार किंवा सेवेचे स्वरूप
२२.कामगाराची श्रेणी
२३.बिगर-आर्थिक उपक्रम
२४.कामाच्या शोधात आहात किंवा कामासाठी उपलब्ध आहात का?
२५.कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याची स्थिती
२६.जन्मस्थान
२७.शेवटचे रहिवास स्थान
२८.स्थलांतराचे कारण
२९.शेवटच्या स्थलांतरानंतर या गावात/शहरात राहण्याचा कालावधी
३०.कायमचा निवासी पत्ता
३१.सध्या हयात असलेल्या मुलांची संख्या (केवळ सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त राहणाऱ्या महिलांसाठी)
३२.आतापर्यंत जन्मलेल्या एकूण हयात मुलांची संख्या
३३.गेल्या एका वर्षात जन्मलेल्या हयात मुलांची संख्या
३४.कोविड-१९ लसीकरणाची जागा
३५.एकूण बँक खात्यांची संख्या
३६.मोबाईल नंबर (उपलब्ध असल्यास)
३७.आधार क्रमांक (उपलब्ध असल्यास)
३८.मतदार ओळखपत्र क्रमांक (उपलब्ध असल्यास)
३९.पासपोर्ट क्रमांक (भारतीय पासपोर्टधारक असल्यास)
४०.ड्रायव्हिंग लायसन्सची उपलब्धता