पोलादपूर (शैलेश पालकर)- पोलादपूर नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडबाबत गेल्या 9 वर्षांपासून अक्षम्य उदासिनता दाखविल्यामुळे आधी पोलादपूर स्मशानभूमीलगत आणि आता महाबळेश्वर रस्त्यालगतच्या चोळई सावित्री संगमावरील डम्पिंग ग्राऊंड तयार झाले असून त्यामुळे मोकाट गायी-गुरे यांच्या पोटात प्लास्टीकचा कचरा जाऊन पोटं मोठी झाली आहेत तर पावसाळयात हा कचरा थेट सावित्री नदीपात्रामध्ये मिसळला जाऊन नदीपात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांतून प्रदुषित पाणीपुरवठा नळाद्वारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याविरोधात ठोस पाऊले उचलण्याऐवजी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होऊन भिंती रंगवून नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सपशेल दूर्लक्ष केले आहे. याविरोधात, संस्थापक राज पार्टे यांच्या ‘आमची माती आमची माणसं’ संघटनेने छ.शिवाजी महाराजांचा पुतळा या डम्पिंग ग्राऊंड वर उभारण्याचे अभिनव आंदोलन हाती घेतले. मात्र, कचराप्रश्नी टोकाची भूमिका नको, अशी विनंती उपस्थित शिवप्रेमींनी केल्यानंतर राज पार्टे यांनी सर्वांसोबत डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन नगरपंचायत जनतेच्या आरोग्यासोबत कसा खेळ करीत आहे, याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दरवर्षी 79 लक्ष रूपयांची कचरा संकलन आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची नियोजनबध्द विल्हेवाट करण्यासंदर्भातील प्रयत्न अपुरे असल्याने या कचराप्रवण क्षेत्रामध्ये चिकनसेंटरमधील जैवकचरा, शहरातील प्लास्टीक पिशव्या व बाटल्यांचा कचरा, वैद्यकीय क्षेत्रातील आणि हॉटेलव्यावसायिकांसह घराघरांतील ओला सुका कचरा याठिकाणी ठेकेदाराकडून टाकला जात आहे. यामुळे मोकाट जनावरांवर होणाऱ्या दुष्परिणामांसह नागरी जीवनावरदेखील मोठया प्रमाणावर वायू प्रदूषण व जलप्रदूषणाची लक्षणं दिसून येत आहेत.