खेड (प्रतिनिधी):- डांबर, डिझेल आणि एलडीओ यांचे दर गगनाला भिडले असल्याने ठेकेदारांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ठेकेदार व त्यांचे कुटुंबिय पूर्णपणे हवालदील झाली आहेत.
डांबराचे दर वाढल्यामुळे छोट्या ठेकेदारांना मोठा फटका बसला आहे. डांबराचे दर एस्टिमेंटपेक्षाही सुमारे ३० टक्क्यांनी वाढीव झाल्याने एस्टिमेंटमध्ये ५५ हजार रुपये असणारा डांबराचा दर रिफायनरीमध्ये सुमारे ९० हजाराच्या आसपास झाला आहे. ५० लाखांच्या आतील कामांच्या ठेकेदारांना भाववाढ मिळत नाही. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या छोट्या ठेकेदारांना मोठा फटका बसत आहे. डिझेलचे सुध्दा दर वाढल्याने वाहतूक व क्रशरच्या खडीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एलडीओच्या दरातही ५० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ठेकेदार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण व अधिक्षक अभियंता जिल्हा परिषद् रत्नागिरी यांची भेट घेऊन डांबर दराविषयी आपल्या भावना निवेदनाव्दारे व्यक्त करणार आहेत. तसेच जी कामे चालू आहेत त्यांना डांबराचा दर उतरेपर्यंत विनादंड ६ महिने मुदतवाढ मागणार आहेत किंवा डांबर दरामध्ये अडजेस्टमेंट करून रस्त्याची लांबी कमी करून देण्याची मागणी करणार आहेत. ठेकेदारांच्या या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यकारी अभियंत्यांनी जिल्ह्यातील ठेकेदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.