सांगली : सांगली जिल्ह्यातील चांदोली अर्थात वारणा धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण ९३.९७ टक्के भरले असून, धरणातून वारणा नदीपात्रात ५ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
चांदोली धरणाची पाणीपातळी सध्या ६२५.२५ मीटर असून, धरणातील एकूण साठा ३२.३२ टीएमसी, तर उपयुक्त साठा २५.४४ टीएमसी झाला आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणात ८ हजार २१७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
स्पिलवेद्वारे ४ हजार ३०० क्युसेक, तर वीज निर्मितीद्वारे १ हजार ६०० क्युसेक असा एकूण ५ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
