नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असून, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एचटीपी प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावांमधील सांडपाणी थेट गोदावरी नदीत जाणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही संबंधित विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या एचटीपी प्रकल्पावर संबंधित विभागाचे नियंत्रण राहणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, सुरू असलेली रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षतोडीशी संबंधित कामे सध्या थांबवण्यात आली असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर निवडीबाबत महापालिकेच्या कारभारात आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगत, निवड महापालिकेच्या नियमांनुसार होत आहे का, हे पाहणे आवश्यक असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात अत्याचार झाला असेल तर संबंधितांवर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
