अकोला : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल.
तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.याचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
अकोला येथील यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह विवाद, निवडणूक आयोग आणि न्यायालयाचे अधिकार क्षेत्र तसेच मराठा व ओबीसी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतर वरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसेल.
