ठाणे : स्वयंपुनर्विकासाच्या मार्गातील प्रशासकीय अडथळे आता दूर होण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध निर्देश दिले आहेत.

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यभरातील स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना ५० टक्के सवलतीच्या दरात TDR आणि अतिरिक्त १० टक्के प्रोत्साहनपर FSI देण्यासाठी UDCPR मध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय PMC करारांवरील मुद्रांक शुल्काबाबत प्रमाणित मसुदा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रखडलेली ४ टक्के व्याज सवलत लागू करण्यासाठी डिसेंबर २०२६च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्वयंपुनर्विकास समन्वयक नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गेल्या सहा वर्षांपासून प्रशासकीय दिरंगाईत अडकलेल्या राज्यातील हजारो गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला या निर्णयांमुळे आता वेग मिळण्याची शक्यता आहे.