मंडणगड : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून वाराणसी (काशी) येथील त्यांच्या पवित्र जन्मभूमीतून आणण्यात आलेल्या मातीच्या कलशाचे मंडणगड येथे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. ‘समरसता संकल्प अभियान’ आणि ‘कलश वंदन यात्रा’ अंतर्गत भाजपा मंडणगड कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत रविदास महाराजांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
संत रोहिदास सेवा संघाचे मंडणगड तालुकाध्यक्ष आनंद सावर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. वाराणसीच्या पवित्र जन्मभूमीतून आलेला मातीचा कलश मंडणगडमध्ये दाखल होताच समाजबांधवांनी श्रद्धेने त्याचे दर्शन घेतले. यावेळी संत रविदास महाराजांच्या समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संत रोहिदास सेवा संघ मंडणगड तालुकाध्यक्ष आनंद सावर्डेकर यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा अधोरेखित केला. ते म्हणाले, “माणसाचे मोठेपण त्याच्या जातीने नव्हे, तर त्याच्या कर्माने आणि विचारांनी ठरते, हा मानवतेचा संदेश संत रविदास महाराजांनी दिला. विषमता, भेदभाव आणि उच्च-नीचतेच्या विचारांना विरोध करून त्यांनी समाजाला समता, बंधुता आणि मानवतेचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांत समाजाला एकत्र आणण्याची आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची प्रेरणा आहे.”
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी संत रविदास महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “वाराणसीच्या पवित्र जन्मभूमीतील मातीचा कलश मंडणगडमध्ये येणे ही आपल्या सर्वांसाठी भावनिक आणि अभिमानाची बाब आहे. हा केवळ मातीचा कलश नसून संत रविदास महाराजांच्या समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेच्या विचारांचे प्रतीक आहे. या पवित्र कलशासमोर समाजात बंधुभाव, समरसता आणि एकोपा वाढविण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा.”
भाजपा मंडणगड तालुकाध्यक्ष दत्ता महाडिक यांनी संत रविदास महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना त्यांच्या समता, मानवता आणि बंधुतेच्या विचारांचा आजच्या पिढीने अंगीकार करण्याची गरज व्यक्त केली. समाजातील भेदभाव दूर करून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा संदेश संत रविदास महाराजांनी दिला, असे त्यांनी नमूद केले.
उत्तर रत्नागिरी सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर यांनी ‘कलश वंदन यात्रा’चा उद्देश स्पष्ट केला. संत रविदास महाराजांचा समता, बंधुता, सेवा आणि सामाजिक न्यायाचा संदेश गावागावांत व घराघरांत पोहोचविणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानामुळे सामाजिक एकता आणि समरसतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.