चिपळूण : कोंढे येथील रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि संस्थेचे मार्गदर्शक संजय शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मेहनत घेऊन तयार केलेल्या ‘रिगल रेसिपी’ या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री ना. योगेश रामदास कदम यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक, अस्सल आणि घराघरात जपल्या गेलेल्या खाद्यपदार्थांचा समृद्ध ठेवा जगासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे, असे प्रतिपादन ना. योगेश कदम यांनी केले.
कार्यक्रमाला माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ,जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग सभापती सौ. मयूरीताई शिर्के, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेच्या मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ. नीलम जाधव, शिक्षण सभापती सौ . हर्षाली पवार , नगरसेविका सौ. राणी महाडिक, बांधकाम सभापती कपिल शिर्के, अंकुश आवले, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळकृष्ण जाधव, संस्थेच्या चेअरपर्सन, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते.
ना. योगेश कदम म्हणाले की, खाद्यपदार्थ म्हणजे केवळ चव किंवा आस्वाद नसून ती एका समाजाची आणि प्रदेशाची संस्कृती असते. कोकणामध्ये दर काही किलोमीटरवर खाद्यपदार्थांच्या कृती आणि चवीमध्ये बदल जाणवतो. ओल्या काजूची भाजी खेडमध्ये ज्या पद्धतीने केली जाते, तीच भाजी सिंधुदुर्गमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. त्यामुळे या पारंपरिक पाककृतींचे दस्तऐवजीकरण होणे आणि त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘रिगल रेसिपी’ हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून तयार केलेले नसून गावोगावी आणि घराघरांत जाऊन जुन्या-जाणत्या व्यक्तींकडून पारंपरिक पाककृती जाणून घेत त्यांची गुणवत्ता, प्रमाण आणि पद्धत समजून घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकामागे विद्यार्थ्यांची मेहनत, अभ्यास आणि संशोधन असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक
रिगल कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे ना. कदम यांनी सांगितले. कोकणातील खाद्यपदार्थांना व्यावसायिक आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले. आजच्या डिजिटल युगात पुस्तकाबरोबरच या पाककृती युट्युबआणि इतर डिजिटल माध्यमांवर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील पारंपरिक पदार्थांच्या रेसिपी डिजिटल माध्यमातून जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचल्यास पर्यटनाबरोबरच स्थानिक खाद्यव्यवसायालाही मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
